Friday, December 20, 2019

Adhuri kahani marathi love story

















अधूरी कहानी

आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच जिच्या येण्याने आयुष्यच बदलून जातं.तिची सोबत कायम हवी हवीशी वाटते.माझ्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती तु होतीस.
तु सोबत असलीस की प्रत्येक दिवस कसा आनंदात जायचा.
हिवाळ्यातल्यात धुक्यात तुझ्यासोबत फिरणं म्हणजे जणू स्वर्गाचा अनुभव.

पाऊस आला कि आपण दोघे मनसोक्त भिजायचो, पावसाचा आनंद घेत असत ,
वाटायचं हे दिवस कधी संपूच नयेत .
शाळेपासूनची आपली ओळख पहिल्यांदा वर्गापुरतीच .शाळा संपे पर्यंत मी सोबत राहू शकलो नाही.
काही कारणाने मला दुसऱ्या शाळेत जावं लागलं.

शाळा संपली पण योगायोग असा कि दोघांना एकाच काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला.
त्यामुळे एकमेकांना ओळखणारे आपण दोघेच होतो आपली मैत्री परत नव्याने सुरू झाली .


शाळेत होतीस तशीच आजही खुप सुंदर दिसायचीस तू गव्हाणी रंग,काळेभोर , लांबसडक, मोकळे केस अन् लांब वेणी,
भिजलेल्या लाल कुंकवाचा गंध दोन्ही भुवयांच्या मध्ये न लावता थोडसं वर लावायचीस,
नाकातली ती पिवळी रिंग,कानात घातलेले लहानसे पांढऱ्या रंगाचे झुमके,
गळ्यातली बारीक मण्यांची तुळसीची माळ.
एका हातात आकाशी रंगाचा गोठ अन् दुसऱ्या हातात पांढऱ्या पट्ट्याचं घड्याळ,
कधी कधी घातला जाणारा घारूळ्या डोळ्यांवरचा नाजूकसा चष्मा, पंजाबी ड्रेसला मॅचिंग रंगाचा स्कार्फ,
नखांना नेलपेंट का लावत नसायचीस माहित नाही,सडपातळ बांधा , आणि वनसाइड बॅग. ...........

नवीन मित्रांसोबत प्रत्येक दिवस
कसा आनंदात जायचा. क्लास मधली धमाल, आपल्या एक एक दिवसांच्या आठवणी कायम लक्षात राहण्या सारख्या.शेतातल्या आठवणी, गुऱ्हाळात पाकात बुडवून खाल्लेला ऊस,
अधून मधून सिनेमा पाहायला जाणं, मित्रांसोबत पाणी पुरी खाणं. काॅलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असत. आपल्या दोघांची जोडी ठरलेलीच...............


कधी मी काॅलेजला आलो नाही तर माझ्याच विचारात दिवसभर हरवून जायचीस.
माझ्यावरून तुझ्या मैत्रिणी तुला नेहमी चिडवायच्या पण तु मात्र त्यांना हसून टाळायचीस.
माझे मित्र पण काही कमी नव्हते चिडवत.
तास् अन् तास , रात्र रात्र फोन चालू असायचा चॅटींग, मैसजिंग ......
काॅलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना माझ्या वाढदिवसाचं तु केलेलं सेलिब्रेशन
आणि तु दिलेलं गिफ्ट कायम लक्षात राहील.त्या दिवशी तु माझ्या घरी आली होतीस.
एकमेकांची काळजी करणं यातूनच आपलं प्रेम व्यक्त झालं.

आयुष्यभर साथ सोडायची नाही, शेवटच्या श्वासा पर्यंत प्रेम निभवायचं.
कितीही संकटं आली तरी कायम सोबत राहायचं, आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात साथ द्यायची,
शपथ घेतली होती प्रेमाची, जीवन मरणाचे वादे केले होते...
काय झालं माहित नाही, आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागली माहित नाही...

काॅलेज संपायच्या पुढं-पुढं तुझ्या घराबाहेर पडण्यावर बंधनं आली,माझ्यापासून दूर दूर राहायला लागलीस .
वाटलं शेवटचं वर्ष असल्यामुळे परीक्षेचा ताण आला असेल.पण तसं काहीही नव्हतं.
कदाचित तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल माहिती झालं असावं.
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तुला भेटण्यासाठी म्हणून सगळ्यात अगोदर आलो काॅलेजला ,
पण नेमकी तु उशिरा आलीस. परीक्षा संपल्यावर तरी भेटशील
म्हणून मुद्दाम पेपर लवकर सोडवून बाहेर आलो पण नेमकं परीक्षा संपताच तुझ्या बाबांची माझ्या अगोदर एन्ट्री !
तुला भेटण्यासाठी तुझ्या घरासमोरून खुपदा चकरा मारल्या पण तु भेटलीच नाहीस
.

एरव्ही एका रिंग मध्ये माझा फोन उचलणारी आज मात्र माझा फोनसुद्धा उचलला नाहीस.
सारखं वाटायचं ह्या मैत्रिणीकडे गेली असशील,
त्या मैत्रिणीच्या घरी येत असशील,
एखाद्या मित्राला फोन केला असशील कि एखाद्या मैत्रिणी जवळ निरोप पाठवला असशील.

प्रत्येक मित्र-मैत्रिणींकडे तुझ्या बद्दल विचारायचो.

वेड्या सारखा इकडून तिकडे फिरत होतो.रात्र रात्र झोप येत नव्हती, कित्येक रात्री अशा जागून काढल्या मी.

कशातच लक्ष लागत नव्हतं. दिवस रात्र फक्त तुझाच विचार.न राहवून तुझ्या लहान बहिणीला एके दिवशी भेटलो.
तिने मला सर्व हकिकत सांगितली,तुझं लग्न ठरलं आहे.

बाबांनी त्यांच्या बहिणीला शब्द दिला होता.
बाबांनी आई बनून तुमचा सांभाळ केलेला.मला माहित आहे. बाबांवर तुझं खुप प्रेम आहे
त्यांचा शब्द तु कधीही मोडणार नाहीस.बाबांच्या शब्दां खातिर तु तुझ्या मनाचा विचार करणार नाहीस ,
त्यांचा निर्णय ऐकल्या वर तु खुप रडली असशील,
स्वतःला खुप त्रास दिला असशील,

मी समोर आल्यावर कदाचित तु स्वतःला आवरू शकली नसतीस म्हणून मला भेटलीही नाहीस
.

बाबांच्या शब्दांचा मान त्यांची इज्जत राखण्यासाठी तु जसा तुझ्या मनावर संयम ठेवलास
तसा मला जमेल कि नाही माहित नाही.
मला विसरण्यासाठी तुझ्याकडे कारण तरी आहे.
कदाचित तु रडून तुझं मन मोकळं करशील,
मनाला समजावण्याचा प्रयत्न करशील.
पण माझा काय दोष .
तुझ्यासारखं रडूही शकत नाही ,
कि तुझा रागही धरू शकत नाही



"
मीही एके दिवशी खुप रडेन,
मनातून रडेन,मनातला सर्व दुःखाचा ज्वालामुखी उद्रेक पावेल,
लहान मुलांसारखा हुंदके देऊन रडेन ....
पण,

त्या दिवशी तुझं लग्न झालेलं असेल".....!!!!!!!!!!